मुंबई : लवकरच ईशान्य मुंबई, पूर्व उपनगरातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेले अनेक वर्ष या विभागातील रहिवाश्यांची या विभागात पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी होती. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकाकडे पाठपुरावा केला होता.


परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमय्यांना पत्र लिहून घाटकोपर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय कळवला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी घाटकोपरच्या पोस्ट कार्यालयाची पाहणी केली. पासपोर्ट केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक साधने येथे आहेत का आणि नियमावलीप्रमाणे जागा आहे का याची पाहणी सोमय्यांनी केली आहे. या ठिकाणी पासपोर्ट केंद्र झाल्यास ईशान्य मुंबईच्या हजारो नागरिकांना फायदा होणार आहे.