जम्मू काश्मीर : बारामुल्ला सेक्टरमध्ये रात्री अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी सापळा रुचून लष्कराच्या एका गस्तीपथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर जम्मू काश्मीर पोलिसांचा एक कर्मचारीसुद्धा या हल्ल्यात ठार झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ला करून दहशतवाद्यांचा गट पसार झालाय. लष्करानं या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम उघडली आहे. गेल्या 40 दिवसांत काश्मीर खोऱ्यातली स्थितीमध्ये थोडासाही बदल झालेला नाही. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आज जम्मूला भेट देणार आहेत. जम्मू काश्मिरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या भेटीचं आयोजन करण्यात आले आहे.


भावी लष्करप्रमुख म्हणून चर्चेत असणारे इस्टर्न कमांड चीफ लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षीदेखील आज जम्मूमध्ये हजर असतील. एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बक्षी जम्मूमध्ये येणार आहेत. मात्र जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीलाही ते हजर राहणार आहेत.


जम्मूमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला. अनंतनाग आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये जमावानं CRPFच्या ताफ्यावर दगडफेक केली. बडगाममध्ये जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी CRPF जवानांनी केलेल्या गोळीबारात पाचांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झालेत. तर अनंतनाग जिल्ह्यात जंगलत मंडी भागात जवानांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला.


हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याला कंठस्नान घातल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 62 जणांचा बळी गेलाय. दरम्यान, हिंसाचाराच्या घटनांनी पुन्हा डोकं वर काढल्यामुळे काश्मीर खोऱ्यात संचारबंदी कायम ठेवावी लागलीये. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या संचारबंदीने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.