एटीएममधून १००च्या ऐवजी निघाल्या २०००च्या नोटा
नोटाबंदीनंतर अद्यापही देशातील विविध भागांमधील एटीएममध्ये पुरेसे पैसे नाहीयेत. राजस्थानच्या टोंक जिल्हयातील एका एटीएममधून मंगळवारी १०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल २०००च्या नोटा येत होत्या. खरंतर या एटीएमच्या सेटिंगमध्ये गडबड झाली होती. यामुळे १००च्या ऐवजी २०००च्या नोटा येत होत्या.
जयपूर : नोटाबंदीनंतर अद्यापही देशातील विविध भागांमधील एटीएममध्ये पुरेसे पैसे नाहीयेत. राजस्थानच्या टोंक जिल्हयातील एका एटीएममधून मंगळवारी १०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल २०००च्या नोटा येत होत्या. खरंतर या एटीएमच्या सेटिंगमध्ये गडबड झाली होती. यामुळे १००च्या ऐवजी २०००च्या नोटा येत होत्या.
रहिवासी जितेश दिवाकर यांनी या एटीएममधून साडेतीन हजार रुपये काढण्यासाठी रक्कम टाईप केली. मात्र साडेतीन हजार रुपयांच्या ऐवजी त्यांना मिळाले तब्बल ७० हजार रुपये.
दिवाकर यांनी याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांना माहिती देईपर्यंत आठ लोकांनी या एटीएममधून पैसै काढले होते. लोकांच्या खात्यातून त्यांनी जितकी रक्कम टाईप केली तितकीच कट झाली मात्र एटीएममधून मिळालेली रक्कम मोठी होती. शाखा अधिकारी हरिशंकर मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अधिकाऱ्यांनी हे एटीएम बंद केले तोपर्यंत सहा लाख रुपये काढण्यात आले होते.
एटीएममध्ये कॅश टाकणाऱ्या एजंसीकडून ही चूक झाल्याने असे घडले. एटीएम मशीनमध्ये नोटांसाठी वेगवेगळे ट्रे असतात. मात्र ऑपरेटरने चुकून १००च्या नोटांच्या ट्रेमध्ये २०००च्या नोटा टाकल्या. यामुळेच १००च्या नोटांऐवजी २०००च्या नोटा एटीएममधून निघाल्या. दरम्यान ज्यांनी ज्यांनी या एटीएममधून पैसै काढले त्यांचा शोध घेतला जात आहे.