जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एटीएसचा एएसपी आशिष प्रभाकर यांचा मृतदेह एका गाडीत सापडलाय. या गाडीत आणखी एका महिलेचा मृतदेहही आढळलाय. ही महिला कोण आहे? याबाबत अजून खुलासा झालेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाडीत दोन मृतदेहांसोबत एक सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही सापडलाय. याच रिव्हॉल्व्हरनं दोघांनाही गोळी लागल्याचं समोर येतंय. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर पोलीस कंट्रोल रुमला आशिष प्रभाकर यांनी कॉल करून ताबडतोब चेतकला (पीसीआर) शिवदासपुरा नजिकच्या एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर पाठवण्यासाठी सांगितलं होतं. परंतु, पोलीस दाखल झाले तेव्हा मात्र त्यांना प्रभाकर यांच्यासोबत एका महिलेचा मृतदेह सापडला.


तोडलं होतं इसिसचं जाळं


जयपूरमध्ये पसरलेलं दहशतवादी संघटना इसिसचं जाळ तोडण्यात आशिष प्रभाकर यांचा मोलाचा वाटा होता. इंडियन ऑईलचे ऑफिसर सिराजुद्दीन यांच्या नेटवर्कची चौकशीही तेच करत होते. शिवाय सीकर आणि कर्नाटकच्या गुलबर्गामधल्या इसिसच्या नेटवर्कचाही त्यांनी पर्दाफाश केला होता.


कुटुंबापासून वेगळे


गेल्या काही दिवसांपासून प्रभाकर हे आपल्या कुटुंबापासून वेगळे राहत होते. जवळपास १५ दिवसांपूर्वी प्रभाकर यांच्या पत्नीनं कंट्रोल रुमला फोन करून ते गायब झाल्याची सूचना दिली होती. तेव्हा मात्र ते कंट्रोल रुमच्या बाहेरच बसलेले आढळले. 


ही घटना घडली तेव्हाही ते सायंकाळी उशिरापर्यंत आपल्या कार्यालयातच बसून एका केसची चौकशी करत होते.