मुंबई : बांगलादेश हल्ल्याचं मुंबई कनेक्शन उघड झाल्यामुऴे देशात नवा वाद निर्माण झालाय. मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईक यांच्या भाषणामुळे आपल्याला हल्ल्याची प्रेरणा मिळाल्याचं एका हल्लेखोरानं कथितरित्या म्हटलंय. यामुळे नाईक यांच्यावर बंदी आणण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाकीर नाईक... मुंबईचे वादग्रस्त धर्मप्रचारक... इस्लाम, धर्म आणि त्याच्याशी निगडीत विषयांवर नाईक यांची भाषणं प्रसिद्ध आहेत... दहशतवादाच्या मुद्द्यावर नाईक तावातावानं बोलतात... त्यांच्या अशाच एका भाषणामुळे बांगलादेशातल्या हल्लेखोरांना प्रेरणा मिळाल्याचं आता बोललं जातंय. त्यामुळे झाकीर नाईक वादात अडकलेत... राज्य सरकारनं त्यांच्या भाषणाचा तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना दिलेत. 


दुसरीकडे केंद्र सरकारनंही हा विषय गांभिर्यानं घेतलाय. याबाबत चौकशी सुरू केली असून आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई केली जाईल, असं केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलंय.


दुसरीकडे झाकीर नाईक यांच्या निमित्तानं भाजपनं काँग्रेसवर टीका करण्याची संधी साधलीय. २०१२ साली मुंबईतल्या एका कार्यक्रमात सिंग यांनी झाकीर नाईक यांची स्तुती केली होती. त्यांचा शांतीदूत असा उल्लेख केला होता... याची आठवण करून देत भाजपानं काँग्रेस नेतृत्वाला टार्गेट केलंय.


यावर उत्तर देताना झाकीर नाईक दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई व्हावी असं दिग्विजय सिंग म्हणालेत. मात्र त्याच वेळी भडकाऊ भाषणं करणाऱ्या सर्वांवरच बंदी घालावी, असं म्हणत त्यांनी झाकीर नाईक यांची बाजू घेण्याचाही प्रयत्न केला.


अमेरिका, कॅनडा, ब्रिटन इथं बंदी असलेल्या झाकीर नाईक यांच्या भाषणांची तपासणी आता होणार आहे... त्यांची भाषणं भडकाऊ असल्याचं आढळल्यास कायद्यानुसार कारवाई होईलच, पण त्याच वेळी देशामधली धार्मिक सलोखा कायम राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे.