बंगळूर : डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे पाच वर्षाचा बालक कोमात गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान पाच वर्षाचा बालक कोमात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथील लक्ष्य पी. नावाच्या विद्यार्थ्याच्या दोन बोटांना १० जून रोजी शाळेतील बाकावर खेळत असताना गंभीर जखम झाली. डॉक्‍टरांनी लक्ष्यला मल्ल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्याच्या पालकांना कळविले. 


पालक हॉस्पिटलात आल्यानंतर मुलाच्या दोन बोटांपैकी किमान एक बोट तरी कार्यरत राहायला हवे आणि दुसऱ्या एका बोटावर प्लास्टिक सर्जरी करणे आवश्‍यक असल्याचे एका महिला डॉक्‍टरने सांगितले. तसेच त्यासाठी ६० हजार रुपये भरण्यास सांगितले, अशी माहिती लक्ष्यचे वडिल पुरुषोत्तम यांनी दिली. 


मात्र शस्त्रक्रियेनंतर लक्ष्यला ऑक्‍सिजन पुरविला नसल्याने त्याच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना धोका असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तसेच लक्ष्यला हृदयाचा विकार असल्याचे सांगितले.


पुरूषोत्तम यावर बोलताना म्हणाले, 'हे ऐकून आम्हाला धक्का बसला. रुग्णालयाने आम्हाला लक्ष्यला मणिपाल रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानंतर ९ दिवसांपासून लक्ष्य कोमामध्ये गेला आहे. मल्ल्या रुग्णालयाने माझ्या मुलाविषयी त्यानंतर काहीही चौकशी केली नाही'.