अहमदाबाद : सध्या बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. पण एकाच विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाल्याची आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत हा प्रकार घडला आहे. हर्षद सरवय्या या मुलाला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले मात्र अन्य विषयात हा विद्यार्थी नापास झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेपरमध्ये केला अफरातफर


या प्रकरणातील धक्कादायक बाब अशी की, हर्षदने लिहिलेला अर्थशास्त्राचा पेपर हा त्याने स्वत:च तपासला आणि स्वत:ला पैकीच्या पैकी गुण दिले. परीक्षकालाही लक्षात येणार नाही अशा चतुराईने हर्षदने हे कृत्य केले. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा गुजरात बोर्डाने हर्षदच्या विरोधात कॉपीचा गुन्हा दाखल केला. जर हा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला दोन वर्षे परीक्षाबंदीची शिक्षा होईल.


भूगोल आणि अर्थशास्त्र या दोन विषयाचे पेपर हर्षदने स्वत:च तपासले. आपले कृत्य कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी हर्षदने मुख्य पानावर गुण देण्याचे टाळले. हर्षदचा पेपर ज्या शिक्षकांनी तपासला त्यांनाही कुठला संशय आला नाही. त्यांनी गुणांची बेरीज करुन एकूण गुण दिले.


किती मिळालेले गुण 


हर्षदला अर्थशास्त्रात शंभर पैकी शंभर, गुजरातीमध्ये (१३), इंग्रजीत (१२), संस्कृतमध्ये (४), सोशोलॉजीमध्ये (२०) आणि भूगोलात (३५) असे गुण होते. हर्षदचा निकाल तयार झाल्यानंतर संगणकावर हर्षदच्या मार्कातील तफावत एका शिक्षकाच्या नजरेस आली. त्यानंतर हा गैरप्रकार समोर आला. हर्षदच्या गुणपत्रिकेशी संबंधित असलेल्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.