लखनऊ : गोरखपूरचे खासदार आणि भाजपचे हिंदूत्ववादी नेते अशी ओळख असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत. मात्र देशातल्या या मोठ्या राज्याचा राज्यकारभार हाकताना, योगी आदित्यनाथ यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशातल्या पूर्वांचलमधला वजनदार नेता, हिंदुत्ववादी नेता, गोरखपूर मे रहना है तो योगी योगी कहना है, ही घोषणा ज्यांच्यासाठी वापरली जाते ते योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्य कारभारी असणार आहेत. 


मात्र देशाच्या राजकारणात महंत योगी आदित्यनाथ यांची ओळख काही वेगळीच आहे. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी योगी आदित्यनाथ नेहमीच विरोधकांच्या रडारवर असतात. यूपी विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांची विधानं निवडणुकीचा मुद्दा बनले. आणि भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनीच पक्षाचा अजेंडा स्पष्ट केला. 


पंतप्रधानांनी यूपीच्या जनतेला दाखवलेली स्वप्नं पूर्ण करण्याचं आव्हान, योगी आदित्यनाथ यांच्यावर असणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याबरोबरच योगी आदित्यनाथ यांच्यासमोर पहिलं आव्हान आहे ती आपली स्वतःची प्रतिमा बदलणं. ऐतिहासिक विजय तर मिळवला. आता लोकप्रिय मुख्यमंत्री होण्याचं आव्हान योगी आदित्यनाथ यांच्यासमोर असणार आहे.