हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.  एन लोकेश यांच्या संपत्तीत २० पटीची वाढ झाली आहे. एन लोकेश यांनी सोमवारी आंध्र प्रदेशच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकेश यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील आर्थिक प्रगतीचा आलेख पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  याबाबत खुलासा करताना एन. लोकेश यांनी म्हटले आहे की, माझ्या संपत्तीत फक्त गेल्या पाच महिन्यांतच वाढ झालेली नाही. 


लोकेश यांची संपत्ती २०१६ साली १४.५० कोटी होती, अवघ्या ५ महिन्यात हा आकडा ३३० कोटींवर जाऊन पोहोचला आहे. एन लोकेश यांच्या नावावर हेरिटेज फुडस लिमिटेडच्या मालकीचे २७३, ८३, ९४, ९९६ इतक्या रकमेचे शेअर्स आहेत.


ऑक्टोबर २०१६ मध्ये लोकेश यांनी त्यांच्याकडे १४.५० कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. तर त्यांची पत्नी ब्राह्मणी हिच्या नावावर ५.३८ कोटी आणि एक वर्षांचा मुलगा देवांश याच्या नावावर ११.१७ कोटींची संपत्ती होती. यामध्ये ९.१७ कोटींच्या वडिलोपार्जित घराचा आणि २ कोटींच्या मुदत ठेवीचाही समावेश होता. मात्र, नव्या प्रतिज्ञापत्रात लोकेश यांनी आपली संपत्ती ३०० कोटी असल्याचे नमूद केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.