मुंबई : गेल्या दोन दशकात भारतातलं सर्वात जास्त लोकप्रिय क्षेत्र म्हणून उदयाला आलेल्या महिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना पिंक स्लिप देऊन घरी बसवण्यात आलं आहे. त्यात इन्फोसिस, कॉग्निझंट आणि टेक महिंद्रा सारख्या बड्या कंपन्यांनी आपले शेकडो कर्मचारी घरी बसवले आहेत.


दरम्यान या सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये सुरू झालेली कर्मचारी कपात पुढच्या काही वर्षात आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होते आहे. दरवर्षी किमान २ लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात सध्या मोठी घबराट पसरली आहे. दरवर्षी या क्षेत्रात साधारण दीड लाख लोकांना रोजगार मिळतो. पण गेल्या काही वर्षात डीजीटायझेशन, आर्टिफिशिअल इंटलिजन्स, रोबोटिक ऑटोमेशन वैगरे क्षेत्रात कमालीची प्रगती झाली आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर कंपन्यांनी आपली रणनीती बदलून खर्च कपातीसाठी नोकऱ्यांवर कुऱ्हाड घातली आहे.