मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?
देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे.
नवी दिल्ली: देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे.
सध्या खासदारांना दरमहा 50 हजार रूपये वेतन मिळते. ते दुपटीने वाढवून 1 लाख रूपये करण्याचा प्रस्ताव आहे. मतदारसंघ भत्ता म्हणून 45 हजार रूपये मिळतात. ही रक्कम 90 हजार रूपये करण्याचा प्रस्ताव आहे. सचिवांचा भत्ता 45 हजार रूपयांवरून 90 हजार रूपये असा वाढवण्यात येणार आहे. 2 हजार रूपयांचा दैनिक भत्ता लवकरच 4 हजार रूपये करण्यात येणार आहे. तर सध्या खासदारांना 20 हजार रूपये पेन्शन मिळतं. ते 35 हजार रूपये करण्याचा प्रस्ताव आहे.
पंतप्रधान कार्यालयाचा या वेतनवाढीला विरोध असल्याचं समजतं. खासदारांनी प्रत्येकवेळी आपलं वेतन वाढवून घेण्यासाठी संसदेत विधेयक आणू नये, असा पीएमओचा सूर असल्याचं कळतंय. दरम्यान, भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील वेतन आढावा समितीनं एकूण 60 शिफारसी केल्या होत्या. त्यापैकी जवळपास 75 टक्के शिफारसी संसदीय कामकाज मंत्रालयानं फेटाळल्याचंही समजतं आहे.