गुजरातमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली
नरेंद्र मोदी यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातलाही दुष्काळाने पछाडले आहे. गुजरात सरकारने सौराष्ट्र आणि कच्छ भागांतील आणखी ४६८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
अहमदाबाद : नरेंद्र मोदी यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या गुजरातलाही दुष्काळाने पछाडले आहे. गुजरात सरकारने सौराष्ट्र आणि कच्छ भागांतील आणखी ४६८ गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
राज्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांत दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सरकारने दुष्काळग्रस्त गावांची यादी घोषित केली.
४६८ गावांपैकी ३०१ गावे कच्छ जिल्ह्यातील, ६४ गावे पोरबंदर जिल्ह्यातील, ५६ गावे जामनगर जिल्ह्यातील आणि ४७ गावे देवभूमी द्वारका जिल्ह्यातील आहेत.
गुजरातमध्ये पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांची एकूण संख्या एक हजारावर पोचली आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त गावांची नावे गावांचा आणि परिस्थितीचा अभ्यास न करता जाहीर केली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. दुष्काळग्रस्त गावांची नावे विस्कळित असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
या महिन्याच्या प्रारंभीच सरकारने ५२६ गावांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने काल जाहीर केलेल्या एका अधिसूचनेनुसार या यादीत आणखी ४६८ गावांचा समावेश केला. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांची संख्या एकूण ९९४ इतकी झाली आहे.