५००-१००० च्या नोटा भरलेल्या गोण्या जळत्या अवस्थेत सापडल्या
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या बातमीनंतर काळा पैसा धारकांची झोपच उडालीय. आपल्याकडे असणाऱ्या काळ्या पैशाचं काय करायचं? असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय.
बरेली : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या बातमीनंतर काळा पैसा धारकांची झोपच उडालीय. आपल्याकडे असणाऱ्या काळ्या पैशाचं काय करायचं? असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय.
यासाठी काहींनी आपला काळा पैसा इंधन भरून, सोनं खरेदी करून किंवा इतर अशाच काही पद्धतींनी पांढरा करण्याचे उद्योग चालवलेत... तर काहींना आपल्याकडील अफाट काळा पैसा पांढरा करण्याचे काहीच मार्ग न सुचल्याने त्यांनी चक्क हे पैसे जाळल्याचं समोर येतंय.
बरेलीत सीबीगंज भागात गोण्यांमध्ये भरलेल्या ५०० आणि १००० च्या नोटा जळत्या अवस्थेत सापडल्यात. एका व्यक्तीच्या हे लक्षात आल्यानंतर त्यानं तात्काळ पोलिसांना याबद्दल सूचना केली.
एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काळं धन लपवण्यासाठी हे काम केल्याचं सांगण्यात येतंय. परसाखेडा इंडस्ट्रियल भागात एका मोठ्या उद्योगपतीच्या कंपनीसमोर पैशांच्या गोण्या जळत्या अवस्थेत सापडल्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार, ५०० आणि १००० च्या नोटा बँक आणि पोस्टाच्या ऑफिसमध्ये एक्सचेंड करू शकता... किंवा हे पैसे तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करू शकता. ४००० रुपयांपेक्षा जास्त नोट बँकत जमा करण्यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र सादर करावं लागणार आहे. त्यामुळे, अफाट काळा पैसा धारकांची पाचावर धारण बसलीय.