पणजी : डेहराडून येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय समीर सारडाना याला गोव्यातील दहशतवादविरोधी पथकाने पणजी येथून अटक केली. दहशतवादी कारवाई केल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे समीरचे वडील भारतीय लष्करातून मेजर जनरल पदावरुन निवृत्त झाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार समीर हा धर्माने हिंदू असला तरी तो इस्लाम धर्माची उपासना करतो. सध्या तो दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात आहे.


समीरला गोव्यातील वास्को रेलवे स्थानकातून अटक करण्यात आली आहे.


रेल्वे पोलिसांना त्याच्या हालचालीत काही संशयास्पद वाटले. म्हणून त्याला त्यांनी ताब्यात घेतले. त्याने आपल्या लॅपटॉपवरुन एकाच आठवड्यात तीनदा डॉर्मिटरीतली एक खोली बुक केली होती.


काही रिपोर्टनुसार त्याचे 'इस्लामिक स्टेट' या दहशतवादी गटाशी संबंध असण्याची शक्यता आहे. समीर हा पेशाने चार्टर्ड अकाऊंटन्ट असून त्याने याआधी काही बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत सौदी अरेबिया, मलेशिया आणि हाँगकाँग या ठिकाणी काम केले आहे.


पोलिसांनी अटक केली तेव्हा समीरकडे एक लॅपटॉप, पाच पासपोर्ट आणि चार मोबाईल सापडले. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलेय. त्यांच्या माहितीनुसार पोलिसांना त्याचा दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे काही सबळ पुरावे मिळालेले नाहीत, असे म्हटलेय.


एटीएसच्या सूत्रांनुसार समीरकडे काही पत्रं आणि ई-मेल्स मिळाले आहेत. ज्यातील माहिती अजून पूर्णपणे उघड झालेली नाही. असे असले तरी त्यात देशात आधी झालेल्या बॉम्बस्फोटांची माहिती आहे.