नवी दिल्ली : घरात आलेला गॅस सिलिंडर एका जागेवरुन दुसऱ्या जागी नेण्यास तुम्हाला त्रास होतो का? तर यापुढे हा त्रास वाचणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम आता हलक्या वजनाचे आणि आकर्षक रंगसंगतीचे गॅस सिलेंडर आणणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) च्या माध्यमातून हे सिलिंडर तयार करण्याचे काम केले जात आहे. हे नवे सिलिंडर फायबरपासून तयार केले जाणार आहेत. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे ते वजनाने हलके असतीलच त्याशिवाय त्यांचा आगीशी संपर्क आल्यास स्फोट होणार नाही. म्हणजेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ते उपयुक्त असतील. ते आकर्षक रंगसंगतीत येतील आणि काही प्रमाणात पारदर्शक असतील. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडरमधील गॅसची पातळी तपासणे शक्य होणार आहे. 


अशाप्रकारचे सिलिंडर परदेशात सर्रास वापरले जातात. आता भारतातच त्याची निर्मिती करुन ते ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. नेहमीच्या लोखंडी सिलिंडरपेक्षा या फायबर सिलिंडरचे वजन निम्मे असले तरी त्याची किंमत दुप्पट असणार आहे. सध्याच्या घरगुती वापराच्या सिलिंडरचे गॅससकट वजन साधारण २९ किलोच्या घरात जाते. 


हिंदुस्थान पेट्रोलियमने सध्या अशाप्रकारचे पाच हजार सिलिंडर तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याच कंपनीतर्फे या नव्या सिलिंडरचे मार्केटिंग केले जाणार आहे. मार्च महिन्यांच्या अखेरीपर्यंत हे सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचतील. पहिल्या टप्प्यात ते महाराष्ट्र आणि गुजरातमधील ग्राहकांना दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांचा देशभरात विस्तार केला जाईल. या नव्या सिलिंडरमुळे देशातील लोखंडाच्या वापरातही बचत होणार आहे.