मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी आरबीआय रेपो दरात कपात केली होती. त्यानंतर आता 4 बॅंकांनी आपल्या व्याजदर कपात केली  आहे. त्यामुळे नवे आणि जुने कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाव टक्के गृहकर्जात आता सूट मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआय रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी व्याजदरात कपात करण्यासाठी नकार दिला होता. याबाबत नवे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनीही उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सरकारी आणि खासगी बँकांनी कर्जदरांत कपात करण्यास सुरुवात केली आहे. बँकांची कर्जे स्वस्त झाल्यास त्याचा थेट लाभ गृह, वाहन, कॉर्पोरेट या कर्जांना सर्वाधिक होणार आहे. 


कर्जकपातीमुळे आगामी काळात कर्जे स्वस्त होणे प्रत्यक्षात येणार आहे. याचा थेट लाभ नव्या ऋणकोंना होणार आहेच, त्याचबरोबर जुन्या तरल व्याजदरांच्या कर्जांनाही हा लाभ घेता येणार आहे.


सार्वजनिक क्षेत्रातील सिंडीकेट बँकेने कर्जदर ९.५५ टक्क्यांवरून घटवून ९.४५ टक्के केला आहे. तर, बँक ऑफ इंडियाने आपला कर्जदर ९.४० टक्क्यांवरून ९.३५ टक्क्यांवर आणला आहे. नव्या कर्जदरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून झाली. भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेने यापूर्वीच, १ ऑक्टोबरपासून ९.०५ टक्के कर्जदराची अंमलबजावणी सुरू केली आहे.


ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सने शुक्रवारी विविध मुदतींच्या कर्जांसाठी कर्जदर ०.१५ टक्क्यांनी कमी केला. बँकेने सहा महिने मुदतीच्या कर्जांसाठी कर्जदर ०.१० टक्क्यांनी कमी करून ९.३० टक्के केला आहे. हे नवे कर्जदर १० ऑक्टोबरपासून लागू होतील. 


युनायटेड बँक ऑफ इंडियाने सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जांसाठी कर्जदर ०.०५ टक्क्यांनी कमी केला आहे. नवा कर्जदर १७ तारखेपासून अंमलात येणार आहे. यामुळे एक वर्ष मुदतीचे कर्ज ९.४५ टक्क्यांऐवजी ९.४० टक्के दराने उपलब्ध होईल. त्याचबरोबर सहा महिने मुदतीचे कर्ज ९.४० टक्क्यांऐवजी ९.३५ टक्क्यांनी उपलब्ध होईल.


कोटक महिंद्र बँक, पंजाब आणि सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक व डीएचएफएल ही हाउसिंग फायनान्स कंपनी यांनीही कर्जदर खाली आणले आहेत. डीएचएफएलने गृहकर्जांचे दर ०.२० टक्क्याने खाली आणत ९.३५ टक्के केले आहेत. नवे दर ११ तारखेपासून लागू होतील. ३० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज घेणाऱ्या नव्या कर्जदारांना याचा लाभ दिला जाणार आहे. 


कोटक महिंद्र बँकेने कर्जासाठीचा आधारदर ०.१० टक्के कमी करत ९.४० टक्क्यांवर आणला असून तो शुक्रवारपासून लागू झाला. पंजाब अँड सिंध बँक व इंडियन ओव्हरसीज बँक यांनी कर्जदरांत ०.०५ टक्के कपात केली आहे.