अहमदाबाद : काही ऐतिहासिक घटनांचे फोटो ही ऐतिहासिक ठरतात, त्या फोटोंवरून त्या घटना ओळखल्या जातात. गुजरात दंगलीच्या बाबतीतही असाच एक फोटो आहे, दंगल पीडित कुतुबुद्दीन अन्सारी यांचा. मात्र आता त्यांना हा फोटो नकोसा झाला आहे. त्यांनी आवाहन केलं आहे, 'कोणीही स्वत:च्या फायद्यासाठी त्या चेहऱ्याचा गैरवापर करू नये'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्सारी याच्या याच फोटोचा वापर काँग्रेसकडून पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केला जात आहे. काँग्रेसच्या अधिकृत बॅनरवर अन्सारीचा फोटो झळकत आहे. त्याआधारे काँग्रेसकडून मोदींना आणि भाजपला लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसच्या या प्रचारतंत्रामुळं अन्सारी अस्वस्थ झाला आहे. आपल्या चेहऱ्याचा असा वापर थांबवावा, अशी विनंती त्यानं केली आहे.


कुतुबुद्दीन म्हणतो, 'मी २९ वर्षांचा असताना ही घटना घडली होती. आता मी ४३ वर्षांचा आहे. गेल्या १४ वर्षांपासून राजकीय पक्ष, बॉलिवूडवाले, इतकंच काय दहशतवादी संघटनाही माझा गैरवापर करत आहेत. 


जेव्हा-जेव्हा माझा चेहरा अशा पद्धतीनं कुठं झळकतो, तेव्हा माझं जगणं आणखी कठीण होऊन जातं. माझी मुलं मला विचारतात की बाबा तुम्ही रडत का होतात? दयेची भीक का मागत होतात?. त्याच्या या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नसतं. आपण २००२सालीच मरायला हवं होतं, असा वाटत राहतं.' व्यवसायानं टेलर असलेला कुतुबुद्दीन बिरजूनगर येथील एका मुस्लिमबहुल चाळीत राहतो.