चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी शशिकलांविरोधात बंड केलं आहे. जयललिता रुग्णालयात असताना त्यांनी मला मुख्यमंत्री बनायला सांगितलं होतं. माझा अपमान आणि छळ करण्यात आला. मला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं, असं पनीरसेल्वम म्हणाले आहेत.


रविवारी  चेन्नईमध्ये AIADMK आमदारांच्या बैठकीत शशिकलांच्या नावावर शिक्कामोर्तब लावण्यात आलं. यानंतर शशीकलांचा आज शपथविधी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण तामिळनाडूचेही राज्यपाल असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव मुंबईहून चेन्नईला गेलेच नाहीत. AIADMKमधले शशिकला समर्थक शपथविधी होणार असल्याचं दिवसभर सांगत होते. मात्र पक्षातूनच झालेला विरोध, सुप्रीम कोर्टात झालेली याचिका या पार्श्वभूमीवर शपथविधीचा आजचा मूहूर्त टळल्याचं चित्र आहे.