आग्रा : ताजमहलमध्ये बुधवारी भगव्या रंगाचा रामनाम लिहिलेला स्कार्फ परिधान केलेल्या एका विदेशी तरुणीला सुरक्षा रक्षकांनी अडवलं... या घटनेवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सीआयएसएफ'च्या जवानांनी या विदेशी तरुणीला हा दुपट्टा उतरवल्यानंतरच आत प्रवेश दिला. हे प्रकरण आता वादात अडकलंय. गुरुवारी भाजपच्या युवा विंग असलेल्या 'भाजयमो'सहीत हिंदू जागरण मंचसारख्या अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी या घटनेचा विरोध केला. 


आगरा भाजपचे अध्यक्ष विजय शिवहरे यांनी तर 'योगी ताजमध्ये आले तर त्यांचेही कपडे उतरवणार का?' असा प्रश्न विचारलाय. शनिवारी आपण भगव्या रंगाचे कपडे परिधान करूनच ताजमहलमध्ये प्रवेश करणार असल्याचं आव्हानंच या संघटनांनी दिलंय. 


ताजमहलमध्ये धार्मिक प्रतिकचिन्ह आणि पूजा सामग्रीवर बंदी असल्याचं कारण देत बुधवारी दिल्लीहून आलेल्या तरुणींना रोखण्यात आलं. या ३४ विदेशी तरुणींपैंकी अनेक मॉडेल्सनं भगव्या रंगाचे स्कार्फ परिधान केले होते. 


दरम्यान, या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.