नवी दिल्ली :  देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीमुळं देशातली सामान्य जनता त्रस्त आहे... एकीकडं लोकांना स्वतःच्या हक्काची रक्कम काढण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर तासन् तास ताटकळत उभं राहावं लागतंय. तर दुसरीकडं गोण्या आणि गाड्या भरून नोटा जप्त केल्या जाताना दिसताय. 


करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडताय... केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात... गंमत म्हणजे सामान्य लोकांना नव्या नोटा पाहायलाही मिळत नाहीत... आणि या साठेबाजांकडं चक्क दोन हजारांच्या नव्या नोटांच्या थप्प्याच्या थप्प्या सापडतायत.


नव्या नोटांच्या थप्प्या... आणि गोण्या...


- पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या पर्वती शाखेत एका खासगी कंपनीच्या १५ लॉकर्समधून तब्बल १० कोटी रूपये जप्त करण्यात आलेत.


- नालासोपाऱ्यात ईडी आणि आयकर विभागाच्या संयुक्त कारवाईत शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापा-याकडून सव्वा कोटी रूपयांची रोकड ताब्यात घेण्यात आलीय.


- ठाण्यातही पोलिसांनी तब्बल एक कोटी रूपयांची रोख रक्कम जप्त केली असून, तिघा आरोपींना अटक केलीय. 


- पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी ६७ लाखांची रोकड जप्त केलीय. 


- दिल्लीत करोल बागमधून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आलीय.


- बेंगळुरुमध्ये आयकर विभागानं धाड घालून सव्वा दोन कोटींच्या नव्या नोटा जप्त केल्यात.


- पणजीमध्येही ६८ लाखांच्या, तर कलंगुटमध्ये २४ लाखांच्या नवीन नोटा हस्तगत करण्यात आल्यात.


- चंदीगडमध्ये इडीनं २ कोटी १८ लाखांची रोकड जप्त केलीय.


- नोएडामध्ये एक्सिस बँकेच्या एका शाखेतून २० बोगस कंपन्यांच्या खात्यांमधून ६० कोटी रुपये जप्त करण्यात आलेत.


- चेन्नईत १० कोटी रुपये, सुरतमध्ये ७६ लाख रुपये, वडोदऱ्यात १९ लाख रुपये, गुजरातच्या अंबालात साडे चार लाखांच्या नव्या नोटा हस्तगत करण्यात आल्यात.


बँक अधिकाऱ्यांचं संगनमत...


नव्या चलनातल्या दोन हजारांच्या नोटा या साठेबाजांकडं आल्या कशा? हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीय. बँक अधिका-यांच्या संगनमताशिवाय एवढा मोठा चलन अपहार शक्यच नाही. एक्सिस या खासगी बँकेच्या अधिका-यांना यापूर्वीच अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या नोटा बदलून देण्याच्या या रॅकेटमध्ये रिझर्व्ह बँकेच्या अधिका-याचाही हात असल्याचं बंगळुरूत उघड झालंय. के. मायकल नावाच्या या आरबीआय अधिका-याकडून सीबीआयनं ५ कोटी ७० लाख रूपयांच्या नव्या नोटा जप्त केल्यात.


एकीकडं काळं धन पांढरं करण्यासाठी जिल्हा बँकांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर सरकारनं जिल्हा बँकावर निर्बंध घातले. आता खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारीच चलन गैरव्यवहार करताना सापडलेत. बँकाचं आता भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्यात का? रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिलेलं चलन सामान्य खातेदारांना मिळतंय की परस्पर लाटलं जातंय, यावर कुणाचं लक्ष आहे की नाही? भ्रष्ट बँक अधिकारी आणि साठेबाजांचं हे सिंडिकेट सरकार कसं मोडून काढणार? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.