नवी दिल्ली : एअर इंडिया अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी लोकसभेत खासदार रविंद्र गायकवाडांनी निवेदन सादर केलं. माझ्यावर अन्याय झाला आहे असं सांगत जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधीसोबत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्यावरचा खूनाचा प्रयत्न केल्याचा आणि धक्काबुक्कीचा आरोप खोटा, असल्याचं गायकवाडांनी म्हटलंय. मी केवळ स्टाफला धक्का दिला... काही नेते मला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही चौकशीविना माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 


माझं बिझनेस क्लासचं तिकीट होतं पण मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं. मी याविषयी तक्रार वहीवर लेखी तक्रारही नोंदवली. दिल्लीत पोहचल्यानंतर केबिन क्रूकडे आपल्या तक्रारीची कॉपी मागितली परंतु, त्यांनी दिली नाही... याचा जाब विचारला तेव्हा विमानाच्या क्रू मेम्बरनं कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, हे सगळं व्हिडिओमध्ये दिसतंय... एअर होस्टेसनंही याबाबत जबाब दिलाय... 'मी एअर इंडियाचा बाप आहे' असंही अधिकाऱ्यानं म्हटल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय. 


मी जर चुकीचा असेल तर मी संसदेची माफी मागतो... परंतु, 'त्या' अधिकाऱ्याची मी माफी मागणार नाही, असंही त्यांनी संसदेत ठणकावून सांगितलं. 


माझ्यावरची विमान प्रवास बंदी हटवण्यात यावी... ही बंदी म्हणजे माझ्या संवैधानिक हक्कावर गदा असल्याचं सांगत दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी त्यांनी केलीय. 


या प्रकरणानंतर एअर इंडिया तसंच इंडिगोनंही खासदार गायकवाड यांचं तिकीट रद्द केलं होतं. या आठवड्यातही एअर इंडियानं गायकवाड यांचे दोन विमान तिकीटं रद्द केले होते.