आयकर विभागाचा कारवाईचा धडाका
हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.
मुंबई : हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.
दिल्ली आणि मुंबईसह देशातल्या अनेक शहरांमध्ये आयटीच्या अधिकाऱ्यांनी छापे घातले आहेत. अनेक जण आता डांबून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयकर विभागानं ही छापेमारी सुरू केलीय.
आयकर खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नवी दिल्लीतल्या करोल बाग, दरीबा कलान तर जुन्या दिल्लीतल्या चाँदनी चौकसह मुंबईत तीन ठिकाणी आणि चंदीगढ, लुधियानामध्ये काही ठिकाणी आयकर खात्याने छापे टाकले आहेत.
हवाला डिलर्सचे धाबे दणाणले
काही व्यापारी, ज्वेलर्स, करंट एक्सेंजवाले आणि हवाला डिलर्सकडून पाचशे आणि हजारच्या नोटा अनधिकृतपणे वटवण्याचा गोरखधंदा सुरू होता. काल संध्याकाळपासूनच अशा सर्वच संशयित ठिकाणांवर आयकर खात्याने लक्ष ठेऊन मग ही कारवाई केली.
ज्वेलर्स, व्यापाऱ्यांवर नजर
देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हि कारवाई सुरु असून नागपुरातही आयकर विभागाने धाडसत्र चालवले आहे... नागपूरच्या शंकर चौक स्थित 'ज्वेलर्स' वर आयकर विभागाने कारवाई केली आहे.. याव्यतिरिक्त नागपुरातील अजून काही व्यापारी प्रतिष्ठानावर आयकर विभागाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.. या कारवाई दरम्यान आयकर विभागाला काय आढळलं याबाबतची माहिती अजून समोर आली नाही.