श्रीहरीकोटा : तब्बल २२ उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जून महिन्यात करणार आहे. इस्रोने नुकतेच 'रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.)' ची यशस्वी उड्डाण चाचणी केली होती.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुढील कामगिरीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, या व्यतिरिक्त जून महिन्यात २२ उपग्रहांचे प्रक्षेपणही आम्ही करणार. यामध्ये नकाशाशास्त्रीय उपग्रहांच्या मालिकेतील एका उपग्रहाचा समावेश आहे. असे इस्रो चे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितले.

फेडरेशन ऑफ कर्नाटका चेम्बर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीने (एफ.के.सी.सी.एल.) आयोजित केलेल्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना हा कार्यक्रम जून महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात २२ पैकी ३ उपग्रह हे भारतीय बनावटीचे असून उर्वरित १९ व्यावसायिक असल्याची माहिती त्यांनी दिली.



यापूर्वी, विक्रम साराभाई स्पेस सेंटर चे अध्यक्ष के. सिवन यांनी इस्रोचे वर्कहॉर्स पोलर रॉकेट पी.एस.एल.वी सी.३४ हे प्रक्षेपणासाठी वापरण्यात येईल असे म्हंटले होते; ज्यात भारताबरोबरच अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनीचे उपग्रह असतील. याआधी २००८ मध्ये या अंतराळ संस्थेने एकावेळी १० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. किरण कुमार इस्रोच्या पुढील प्रक्षेपणांची माहिती देताना म्हणाले, यानंतर लगेचच स्कॅटरामीटरचे प्रक्षेपण होईल आणि मग आयएनसएटी ३ डीआर या तापमान आणि आद्रता यांची माहिती देण्याऱ्या भूस्थिर उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जाईल.

दरम्यान, इस्रोने सोमवारी 'रियुझेबल लाँच व्हेकल (आर.एल.वी.) स्वदेशी' चे श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून यशस्वी उड्डाण चाचणी केली. 'रियुझेबल रॉकेट' अवकाश प्रवेशासाठी लागणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करेल.