आयटम साँगच्या हट्टामुळे विवाह मोडला
नववधू भरमंडपातून विवाह मोडून निघून गेल्याची घटना उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात घडली.
फिरोझाबाद : नववधू भरमंडपातून विवाह मोडून निघून गेल्याची घटना उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात घडली.
लग्नाच्या रात्री नववधूवर नवऱ्यासोबत बॉलिवूडच्या आयटम साँगवर डान्स करण्याची जबरदस्ती नवरदेवाने केली, यामुळेच वधूने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवऱ्याच्या मित्रांनी नवविवाहीत जोडप्याकडे आयटम साँगवर डान्स करण्याचा आग्रह धरला. यावेळी विवाह सोहळा सुरू होता आणि नववधूनेही नकार दिला.
वधू स्टेजवरच थांबली. त्यानंतर नवऱ्याने डान्स फ्लोअरवर जाऊन मित्रांसोबत जाऊन ठेका धरला. यानंतर नवरा स्टेजवर आला आणि नववधूला सोबत डान्स करण्यासाठी जबरदस्ती करु लागला.
वधूच्या काकांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण चिडलेल्या नवरदेवांनी थेट त्यांच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे संतापलेल्या वधूने गळयातील हार काढून फेकून दिला आणि लग्न मोडल्याचे जाहीर करुन स्टेजवरुन निघून गेली.
यानंतर वादावादी सुरू झाली, पोलीस आले, आता नवरदेव आणि त्याच्या वडिलांसह ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.