नवी दिल्ली : आज एका बाजुला काँग्रेसचे कार्यकर्ते आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसले... तर दुसऱ्या बाजुला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र उर्जित पटेल यांच्या बचावासाठी संसदेच्या आर्थिक समितीसमोर उतरले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना बुधवारी संसदेच्या आर्थिक समितीसमोर पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी समितीनं विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देणं मात्र पटेल यांना जड जात होतं. त्यांना समाधानकारक उत्तरं देता येत नसल्याचं लक्षात आल्यावर मनमोहन सिंहांनी हस्तक्षेप केल्याचं पीटीआयनं म्हटलंय.


बँकांमध्ये व्यवहार सुरळीत कधी होणार याविषयी काही कालमर्यादा देता येईल का? असा प्रश्न समितीच्या सदस्यांनी विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना पटेल काही काळ भांबावले... त्याच वेळेला त्यांची मदत करण्यासाठी माजी पंतप्रधान आणि एकेकाळचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मनमोहन सिंग सरसावले. 


मनमोहन सिंहांनी लगेचच हस्तक्षेप करून रिझर्व्ह बँकेच्या स्वायक्तेचा मान राखून प्रश्न विचारा, असा इशारा वजा सल्ला समितीच्या सदस्यांना दिला. तसंच पटेल यांना ज्या प्रश्नांमुळे आरबीआयसाठी समस्या निर्माण होऊ शकतात, अशा प्रश्नांची उत्तर देऊ नये, असा सल्ला दिला. 


एकूणच काय तर आरबीआयची स्वायत्तता किती महत्त्वाची आहे, हे मनमोहन सिंग यांनी राजकारण बाजूला ठेवून आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलंय, असंच म्हणावं लागेल.