पणजी : आज रविवारी सकाळी पणजीकरांना एक आनंदाचा धक्का बसला. कारण, खुद्द देशाच्या संरक्षण मंत्र्यांनीच कोणत्याही सुरक्षेची पर्वा न करता एका रेस्टॉरंटमध्ये आरामात नाश्ता केला आणि ते निघून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे चर्चा होत आहे देशाचे संरक्षणमंत्री असणाऱ्या मनोहर पर्रिकरांची. रविवारी सकाळी पणजी महानगरपालिकेच्या मतदानासाठी मनोहर पर्रिकर शहरातल्या मॅसो दि अमोरिन परिसरात आले होते. तिथे आल्यावर सामान्य नागरिकाप्रमाणे ते मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहिले.


मतदान झाल्यानंतर ते वाटेतील त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेले. नागरी वेशात असलेले त्यांचे सुरक्षारक्षकही त्यांच्या या वागण्यामुळे थोडे आश्चर्यचकित झाले. रेस्टॉरंटमध्ये त्यांनी प्रवेश करताच तिथे उपस्थित लोकांना धक्काच बसला.


रविवार सकाळ असल्याने जवळच्याच चर्चमध्ये संडे मास झाल्यानंतर या रेस्टॉरंटमध्ये येऊन नाश्ता करणे ही या भागातील लोकांची आवडती सवय आहे. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये तशी लोकांची गर्दीही होती. इतक्या गर्दीत देशाच्या संरक्षण मंत्र्याने सहजतेने वावरणं हा इथल्या लोकांसाठी धक्काच होता.


'गोवेकरांना मनोहर पर्रिकरांच्या साधेपणाचा अनुभव यापूर्वीही अनेकदा आला आहे. पण, संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांनी इतके साधेपणाने वागणे, हे आश्चर्यचकित करणारे आहे,' अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. 'एका स्मार्ट शहरासाठी स्मार्ट पालिकेची गरज आहे. त्यामुळे भाजपच ते लोकांना देऊ शकतो,' असे मत त्यांनी व्यक्त केले