नवी दिल्ली : शांती आणि सद्भाव यांचा संदेश देण्यासाठी इस्लाम धर्माची तारीफ करताना 'अल्लाहच्या ९९ नावांपैकी कोणत्याही नावाचा अर्थ हिंसेशी संबंधित नाही' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुरुवारी ते नवी दिल्लीत सुरू झालेल्या जागतिक सूफी परिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतावादाचा सामना म्हणजे कोणत्याही धर्माशी केलेला सामना नसतो, धर्म आणि दहशतवाद यांना वेगवेगळे केले पाहिजे अशी गरज त्यांनी वर्तवली. जेव्हा हिंसेची सावली मोठी होत जाते तेव्हा सूफी म्हणजे आशादायी किरण असल्याचे मोदी म्हणाले. बंदुकींमुळे जेव्हा लोकांचे आवाज बंद होतात तेव्हा सूफी संतांचा आवाज सर्वांना आशा देतो, अशा शब्दांत मोदींनी सूफी परंपरेचे कौतुक केले. 


प्रत्येक धर्मात असलेल्या चांगल्या मूल्यांच्या आधारे आणि धर्मांनी दिलेल्या वास्तववादी संदेशानुसार आतंकवादावर विजय मिळवण्याची आशा मोदी यांनी व्यक्त केली. धर्माच्या नावावर दहशतवाद पसरवणारे लोक धर्मविरोधी असल्याची टीकाही मोदी यांनी केली. 


देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून धार्मिक तणाव वाढत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच मोदींतर्फे अशी विधाने आली आहेत. सूफी परंपरेने आजही मोहम्मद पैगंबर आणि इस्लामच्या मूळांना धरुन ठेवले असल्याचे मोदी म्हणाले. मोहम्मद पैगंबरांचे कोणतेही नाव ताकद किंवा हिंसेशी संबंधित नसल्याचे मोदी यांनी सांगितले. 


काल 'भारत माता की जय'च्या जयघोषात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर जवळपास अर्धा तास नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. भाषणादरम्यान हिंसेचे आव्हान पेलण्यासाठी लोकांनी पवित्र कुराणाचा संदेश लक्षात ठेवावा असेही मोदी यांनी नमूद केले.