मोदींना एमएमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये किती मार्क ?
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन आता दोन वर्ष होतील. या दोन वर्षांच्या काळामध्ये मोदींच्या परदेश दौऱ्यावर नेहमीच चर्चा झाली.
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन आता दोन वर्ष होतील. या दोन वर्षांच्या काळामध्ये मोदींच्या परदेश दौऱ्यावर नेहमीच चर्चा झाली. या परदेश दौऱ्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारल्याचा दावा भाजपनं वारंवार केला.
पण एम.ए.ची डिग्री घेणाऱ्या नरेंद्र मोदींना एमएच्या परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयात सगळ्यात कमी मार्क होते. मोदींना आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात 48 मार्क होते, तर बाकीच्या विषयांमध्ये 60 च्या वरती मार्क होते. पंतप्रधानांनी गुजरात विद्यापीठातून एमए केलं आहे.
एमए पार्ट 1 मध्ये मोदींना 400 पैकी 237 मार्क मिळाले, तर एमए पार्ट 2 मध्ये त्यांना 400 पैकी 262 मार्क मिळाल्याची माहिती गुजरात विद्यापीठानं दिली आहे. त्यामुळे मोदींना एमएच्या दोन्ही परीक्षा मिळून 800 पैकी 499 म्हणजेच 62.3 टक्के मार्क मिळाले. गुजरात विद्यापीठामध्ये मोदींनी 1981मध्ये ऍडमिशन घेतली आणि 1983 मध्ये मोदी एमए पास झाल्याची प्रतिक्रिया विद्यापीठानं दिली आहे.
आप पक्षानं पंतप्रधानांच्या डिग्रीवर आक्षेप घेतले होते. पंतप्रधानांची डिग्री खोटी असल्याचा आरोप अरविंद केजरीवालांनी घेतला होता. याला भाजपनं प्रत्युत्तर दिलं होतं. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या बीए आणि एमए डिग्री प्रसिद्ध केल्या होत्या.
शहा आणि जेटलींनी प्रसिद्ध केलेल्या या डिग्रीवरही आपनं आक्षेप घेतले होते, बीए आणि एमएच्या डिग्रीमधल्या नावामध्ये फरक असल्याचं आपचं म्हणणं होतं. पण मोदींनी एमए पार्ट टू करताना नरेंद्रकुमार दामोदरदास मोदी हे नाव बदलून नरेंद्र दामोदरदास मोदी असा बदल केल्याचं स्पष्टीकरण विद्यापीठानं दिलं आहे.