नवी दिल्ली : यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केलेय. केरळात मे अखेरपर्यंत पाऊस दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान खात्यासह हवामानाचा अंदाज व्यक्त करणार्‍या अनेक संस्थांनी वर्तविलेल्या भाकितानुसार केरळमध्ये मेअखेर किंवा जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन होईल, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रशास्त्र मंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


केरळ किनारपट्टीवर १५ मे दरम्यान, हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाऊस मे अखेरपर्यंत केरळात दाखल होईल. भारतीय हवामान खात्याची मान्सून अंदाज व्यक्त करण्याची कौशल्यपूर्ण यंत्रणा जगातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक सरस आहे. दीर्घावधीच्या हवामान अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाणे १०६ टक्के राहण्याची शक्यता आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.


यंदाच्या मान्सूनमध्येर पाच टक्के घट वा वाढ होईल. २००५ पासून मान्सूनचा पूर्वअंदाज व्यक्त करण्याची पद्धत सुरु करण्यात आल्यानंतर आजमितीपर्यंत १० वर्षापर्यंत (२००५-२०१४) मान्सूनबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे, असे त्यांनी सांगितले.