नवी दिल्ली : मुलायम सिंह यांनी म्हटलं की, मी ३ वेळा अखिलेशला बोलावलं पण तो एक मिनिटासाठी आला आणि माझं न ऐकताच निघून गेला. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातामध्ये खेळला जात आहे. रामगोपालच्या इशाऱ्यावर काम करतो आहे. सोबतच त्यांनी म्हटलं की निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी पक्ष आणि सायकल दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अखिलेशने माझं ऐकलं नाही त्यामुळे आता मी त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.


मुलायम सिंह यादव यांनी पक्षात फूट पडू नये म्हणून अखिलेश यादव यांच्यासोबत बैठक केली. पण त्यामधून काहीच निष्कर्ष निघला नाही. अखिलेश ३ महिन्यासाठी पक्षाचे अध्यक्षपद आणि तिकीट वाटपाच्या मुद्द्यावर ठाम होता. पण मुलायम यादव अध्यक्षपद सोडायला तयार नव्हते.
आज निवडणूक आयोगाच्या कोर्टात हा मुद्दा पोहोचला आहे की, सायकल चिन्ह हे कोणाला दिलं जावं. किंवा दोघांनी वेगळ्या पक्षचिन्हासह निवडणूक लढावी असा देखील निर्णय निवडणूक आयोग देऊ शकते. पण या कौटुंबिक कलहानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहे. पिता-पुत्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. त्यामुळे आता जनता कोणाच्या पारड्यात मत टाकते हे पाहावं लागेल. हा वाद लक्षात घेत जनता दोघांना डावलते की मग याचा फायदा दोघांपैकी कोणाला होतो हे वेळच सांगेल पण पिता-पुत्राच्या या राजकीय वादामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण आणि निवडणूक चांगलीच तापणार आहे हे मात्र निश्चित.