त्या स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेस गोत्यात
उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. पण याआधीच बाहेर आलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. पण याआधीच बाहेर आलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. या स्टिंगमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी आमदारांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप आहे.
एका न्यूज चॅनलनं हे स्टिंग ऑपरेशन प्रसिद्ध केलं आहे. उत्तराखंडमध्ये 10 मे ला काँग्रेसला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यातच आता या स्टिंग ऑपरेशनमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
याआधीही अशाच प्रकारचं एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. या स्टिंगमध्ये हरीश रावत आमदारांच्या घोडेबाजारीवर बोलत असल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणामध्ये सीबीआयनं आधीच हरीश रावत यांना समन्स पाठवला आहे. सोमवारी या प्रकरणी रावत यांची चौकशीही होणार आहे.
काँग्रेसच्या फुटलेल्या 10 आमदारांनी हरीश रावत यांचं हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं, ज्यामध्ये रावत यांनी सरकार वाचवण्यासाठी 5 कोटी रुपये स्वत: आणि 10 कोटी रुपये दुसऱ्या कोणाकडून आमदारांना द्यायचं आश्वासन दिलं होतं, असा आरोप आहे. 23 मार्चला आम्ही हे स्टिंग ऑपरेशन केल्याचा या आमदारांचा दावा आहे.