डोमेस्टिक विमान प्रवासासाठीही पासपोर्ट किंवा `आधार`
येत्या २-३ महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्डची गरज भासण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : नागरी उड्डाण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांची ओळख महत्वाची गोष्ट बनली आहे. म्हणून येत्या २-३ महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्डची गरज भासण्याची शक्यता आहे.
मंत्रालय लवकरच एक 'नो फ्लाय' यादी बनवणार आहे. यामध्ये चार प्रकारच्या अपराधांच्या हिशेबाने कारवाई निश्चित होणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही यंत्रणा लागू करण्यासाठी प्रवाशांची ओळख पटावी यासाठी आम्हाला अशी यंत्रणा उभा करावी लागणार आहे. पण जेव्हा तिकिटाचे बुकिंग करताना पासपोर्ट किंवा आधार कार्ड पुरवण्यात येईल, तेव्हाच हे शक्य होईल. या दोन्ही दस्ताऐवजपैकी एक निवडावे लागेल.
मंत्रालयाकडून पुढील आठवड्यापर्यंत या नियमाचा मसुदा जनतेसाठी समोर येईल. याबाबत सूचना देण्यासाठी जनतेकडे ३० दिवसांचा कालावधी असेल. येत्या जून किंवा जुलै महिन्यात हा नवा नियम अमलात येऊ शकतो, असेही समजते. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा हे फार पूर्वीपासून ‘नो फ्लाय’ यादीवर काम करत आहेत.