नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत 'न भूतो न भविष्यति' असं चित्र दिसलं. काल चक्क सर्व विरोधकांनी एकत्र येऊन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं तोंडभरुन कौतुक केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मला सुषमा स्वराज यांचे आभार मानायचे आहेत. आपल्या देशातील लोकांचं परकीय भूमीवर रक्षण करण्यासाठी त्या खूप चांगलं काम करतायत,' असं पहिल्यांदा आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान म्हणाले. 'माझ्या मतदारसंघातील १३ लोकांना सौदी अरेबियात जायबंदी केलं गेलं होतं. मी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटायला गेलो. त्यांनी लगेचच सूत्र हलवली आणि या व्यक्तींची सुटका करुन त्यांना सुखरुप परत आणण्यात आलं,' असे ते पुढे म्हणाले.


तर आम आदमी पक्षाचे दुसरे खासदार धर्मवीर गांधी म्हणाले की 'मी कोणताही प्रश्न विचारायला इथे उभा राहिलो नाही. मला फक्त सुषमाजींचे आभार मानायचे आहेत. आम्हाला नेहमी गरजेच्या वेळी त्यांची मदत मिळते. त्यांनी पंजाबसाठी खूप काही केलंय.'


तर यानंतर बिजू जनता दलाचे खासदार बैजयंत जय पांडा यांनी इतरांच्या सूरात सूर मिळवला आणि 'मंत्री' म्हणून त्यांची कामगिरी खूपच चांगली राहिली आहे' असं म्हणत स्वराज यांचे कौतुक केलं.


सुषमांच्या हिंदीचंही कौतुक
तर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव यांनी एका वेगळ्याच गोष्टीसाठी स्वराज यांचे कौतुक केलं. 'सुषमाजी हिंदीत बोलतात यासाठी मी त्यांचे आभार मानतो. इंग्रजीत प्रश्न विचारुनही त्यांनी मला हिंदीत उत्तरे दिली आहेत, जे चांगलं आहे. सभागृहातील काही सदस्य हिंदी उत्तम येत असूनही इंग्रजीशिवाय बोलत नाहीत,' असे मत त्यांनी मांडले.


स्वराज यांनी मानले आभार
सभापती सुमित्रा महाजनही या कौतुक समारंभामुळे आश्चर्यचकित झाल्या. शेवटी सुषमा स्वराज यांनी उभे राहून हात जोडत 'ज्यांनी माझे आभार मानले त्या सर्वांचे मी आभार मानते,' अशी प्रतिक्रिया दिली.