भोपाळ : भोपाळच्या सेंट्रल जेलमधून पळालेल्या सिमीच्या आठही दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. मध्य प्रदेश पोलिसांच्या या कारवाईवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एन्काऊंटरचे जे फोटो दिसत आहेत त्यामध्ये हे सगळे दहशतवादी जीन्स आणि बुटांमध्ये दिसत आहेत. कैद्यांना जेलमध्ये असे कपडे मिळतात का? हे दहशतवादी चमचे आणि प्लेट घेऊन पळाले होते. चमचे आणि प्लेटसारखी हत्यारं घेऊन पळालेल्या दहशतवाद्यांचं पोलिसांनी एन्काऊंटर का केलं? त्यांना अटक करून कोर्टात हजर करून कडक शिक्षा द्यायला पाहिजे होती, असं ओवेसी म्हणाले आहेत.


या सगळ्या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयानं चौकशी करावी अशी मागणीही ओवेसींनी केली आहे. याआधी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही या एन्काऊंटरवर आक्षेप घेतले होते. हे दहशतवादी पळाले होते का त्यांना पळवण्यात आलं होतं असा सवाल दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केला होता.