चेन्नई : तामिळनाडूनच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविल्याने त्यांना ४ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्यांनी तातडीने पक्षाची बैठक घेऊन ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. जाता जाता शशिकला यांनी पनीरसेल्वम यांना दणका दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, इदापादी के पालानीसॅमी यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचे संकेत मिळाले आहेत. पनीरसेल्वम यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांना न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा सुनावताच मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. शशिकला यांच्या मर्जीतील ई. पलनीसमी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करुन आपणच सूत्र चालविणार असल्याचे संकेत शशिकला यांनी दिलेत. त्यामुळे अण्णाद्रमुख पक्षात अंतर्गतवाद अधिकच उफाळला आहे.


गेल्या काही दिवसांपासून शशिकला यांनी तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याशी उभा वाद होता. त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षात मोठ्याप्रमाणावर अंतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी ओ.पनीरसेल्वम मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर शशिकला यांनी हे पद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. 


शशिकला यांनी १०० आमदारांना एका हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवले होते. तर पनीरसेल्वम यांनी आपल्याला पक्षीय आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत शशिकला यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, शशिकला यांनी ज्ञात उत्त्पन्न स्त्रोतापेक्षा ६६.६५ कोटी रूपयांपेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा आरोप होता. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार जयललिता या मुख्य आरोपी असून अन्य तिघेजण ३२ खासगी मालमत्तांचे बेनामी मालक होते.