नोटबंदीला एक महिना पूर्ण, पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या महिनापूर्तीच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात सुरु केलेल्या यज्ञात भारतीयांनी लावलेल्या हातभाराबद्दल सर्वांना सलाम करतो असं पंतप्रधानांनी म्हटलंय. सरकारच्या निर्णयामुळे सध्या जरी त्रास होत असला, तरी भविष्यात याचे अनेक फायदे होणार असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.
देशभरात दडलेला काळा पैसा बाहेर यावा या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून पाचशे आणि 1000च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. तेव्हापासून आजपर्यंत या जुन्या नोटांच्या स्वरुपात तब्बल 11 लाख 55 हजार कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे 2 हजार आणि पाचशेच्या नव्या नोटाही मोठ्या प्रमाणात चलनात आल्या आहेत. पण रोख रक्कमेसाठी लोकांना अजूनही बँकामध्ये रांगा लावाव्या लागत आहेत.
देशातली 1 लाख 80 हजाराहून अधिक एटीएम नव्या नोटांसाठी रीकॅलिबरेट करण्यात आली आहेत. त्यामुळे बहुतांश एटीएममधून आता पाचशेच्या नोटाही बाहेर येत आहेत. पण अजूनही सुटे पैसे मिळत नसल्यानं जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती सुधारेल असं सरकार आणि रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. पण तूर्तास तरी आणखी काही दिवस रोखीची चणचण भासत राहणार हे निश्चित आहे.