विरोधक गोंधळ घालून देशाबरोबर स्वत:चे नुकसान करत आहेत : नरेंद्र मोदी
लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला समाचार घेतला. गोंधळ घालून देशाबरोबर विरोधक स्वत:चे नुकसान करत आहेत, असे मोदी म्हणालेत.
नवी दिल्ली : लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला समाचार घेतला. गोंधळ घालून देशाबरोबर विरोधक स्वत:चे नुकसान करत आहेत, असे मोदी म्हणालेत.
गेले काही दिवस संसदेत जे काही घडत आहे त्यामुळे देश चिंतेत आहे. संसदेचे कामकाज चालत नाही तेव्हा फक्त सत्ताधारी पक्ष आणि देशाचेच नुकसान होते असे नाही. उलट यामुळे स्वत:चे म्हणणे मांडता न आल्यामुळे विरोधी पक्षातील खासदारांचे आणि पर्यायाने विरोधी पक्षाचेच अधिक नुकसान होत आहे. ही बाब गंभीर आहे, असे मोदी यांनी निवेदन करताना म्हटले.
संसदेत विरोधकांकडून घालण्यात येणारा गोंधळ आणि वारंवार सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याच्या मुद्द्यावरून मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ते गुरूवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. यावेळी मोदींनी गांधी घराण्यासाठी दैवतासमान असणाऱ्या राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या विधानाचे दाखले देत सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणण्यावर टीका केली.
राहुल गांधीना टोला लगावला
काही लोकांचे फक्त वय वाढते, परंतु समज वाढत नाही. काही गोष्टी सांगितल्या तरी लवकर समजत नाहीत. काही समजतात पण खूप वेळ लागतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला.
राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी यांच्यावर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केला होता. त्याला मोदींनी प्रत्युत्तर दिले. भाजप राबवित असलेल्या अनेक योजनांचे श्रेय काँग्रेसचेच असल्याचे राहुल गांधींनी म्हटले होते.
दरम्यान, मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद व्यक्त केले. राजकीय प्रक्रियेत महिलांच्या सक्रिय सहभागासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे असून महिला दिनानिमित्त फक्त महिला खासदारांना बोलण्याची संधी देण्यात यावी तर एका आठवड्यात फक्त पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना बोलण्याची संधी द्यावी, असे मोदी म्हणालेत.