कुलभूषण जाधव मृत्यूदंडाचा देशभर निषेध
पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. त्याविरोधात आज देशभरात निदर्शन सुरू झाली आहेत.
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. त्याविरोधात आज देशभरात निदर्शन सुरू झाली आहेत.
नौदल सेवेतील निवृत्त कमांडर अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी सरकारने हेरगिरी प्रकरणात पुरेसे पुरावे नसतानाही दोषी ठरवलंय. याचा निषेध म्हणून दिल्लीत पाकिस्तानी दूतावासाबाहेर जाधवांच्या समर्थनात घोषणाबाजी आणि मोर्चा काढण्यात आला.
जावळीमध्येही पडसाद...
याच घटनेचे सातारा जिल्ह्यातील जावळी या जाधव यांच्या गावीही पडसाद उमटलेत. जावळी गावात जाधव यांनी शेतात घर बांधले असून काही काळ तिथे वास्तव्यही केलं आहे. सामाजिक कामाच्या आवडीमुळे अल्पावधीत ते गावातील अनेक कामात व्यस्त असायचे. जावळी गावच्या ग्रामस्थांनी पाकिस्तान सरकारच्या या कृत्याचा निषेध करत धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांच्याप्रमाणेच जाधव यांची सुटका करण्याची मागणी त्यानी भारत सरकारकडे केलीय. तर नागपूरमध्येही जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करण्यासाठी काही तरूण रस्त्यावर उतरलेले दिसले.