नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीच्या मोदींच्या यज्ञात गरिबांचा बळी जात असल्याची खरमरीत टीका राहुल गांधींनी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३२ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळा पैसा किती नष्ट केला, ते घोषित करा. स्वीस बॅंकेत कोणाची अकाऊंटस आहेत ती जाहीर करावीत, नोटाबंदीचा निर्णय कोणाला विचारुन घेतला, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित करुन काँग्रेस लोकांसोबत उभी राहून नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या विचारधारेचा पाडाव करेल, असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला. नोटाबंदीच्या यज्ञात सामान्य माणसाचा बळी जात आहे. देशातील ५० कुटुंबांसाठी नोटाबंदीचा यज्ञ दिला गेलाय, अशा भाषेत राहुल यांनी मोदींवर घणाघात केला.


शेतकऱ्यांची कर्ज माफ करा, हमीभावावर २० टक्के बोनस द्या, द्रारिद्र रेषेखालच्या गृहिणींच्या खात्यात २५  हजार रुपये जमा करा, आदी आठ मागण्या राहुल गांधींनी केल्यात. 


त्याआधी नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक झाली.बैठकीनंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आलेला नाही. नोटाबंदीमुळे शेतकरी आणि गरीबांचे हाल होत आहेत, असे म्हटले होते. 



दुसरीकडे दहशतवादी हल्लेही थांबू शकलेले नाहीत. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसल्याचे दिसते, असे त्यांनी म्हटले होते. या बैठकीत तृणमूल काँग्रेस, डीएमके, राष्ट्रीय जनता दलाचे नेते सहभागी झाले होते.



दरम्यान, नोटाबंदीच्या मुद्यावरुन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांच्या अंमलबजावणीचं नियोजन चुकल्याची टीका पाटील यांनी केलीय. जवळपास 8 वर्षांनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय.  तर नवनवीन निर्णय घेऊन मोदी सरकार देशात दहशतीचं वातावरण निर्माण करत असल्याची टीकास्त्र राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सोडले.