नव्या दमाने येणार काँग्रेसची `टीम राहुल`
नवी दिल्ली : २०१४ च्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारणीचे प्रयत्न करतोय.
नवी दिल्ली : २०१४ च्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा उभारणीचे प्रयत्न करतोय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा करिश्मा कोणत्याही निवडणुकीत चालत नसल्याची बाब सर्व काँग्रेस जनांना खटकते आहे. पण, राहुल गांधी कात टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी नव्याने आपली टीम तयार करत आहेत.
राहुल गांधी काँग्रेस पक्षाला 'कॉर्पोरेट' टच देण्याचा प्रयत्न करतायेत. आता ते पक्षात चाणाक्ष आणि हुशार तरुणांचा एक गट तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यासाठी ते स्वतः उमेदवारांचे टॅलेंट तपासतायेत आणि त्यांच्या मुलाखतीही घेत आहेत. 'मेल टुडे'मधील एका वृत्तानुसार स्वतः राहुल गांधींनी आत्तापर्यंत ६०० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
खरंतर २०१४ च्या पराभवानंतरच राहुल गांधींनी या बदलाला सुरुवात केली होती. परंतु, पक्षातीलच ज्येष्ठांनी त्यांना विविध मार्गांनी विरोध केला होता. आता मात्र या नव्या 'टीम राहुल' मध्ये ज्येष्ठ आणि तरुण रक्ताचा सहभाग असेल. याच वृत्तानुसार राहुल गांधी त्यांच्या पक्षात अजून जास्त प्रमाणात लोकशाही आणण्याच्याही प्रयत्नांत आहेत.
गेले अनेक महिने राहुल गांधी पक्षाध्यक्ष होतील आणि सोनिया गांधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातील, अशा बातम्या येत होत्या. पण, पक्षाकडून मात्र याला काही दुजोरा देण्यात आलेला नाही.