नवी दिल्ली : रेल्वेचा कारभार कागदरहित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय काही महत्त्वाची पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे मंत्रालय आता रेल्वे टीसी टॅबलेट देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोयीमुळे आता टीसी त्यांच्या टॅबलेटच्या माध्यमातून तिकीटांचे स्टेटस तपासू शकतील. यामाध्यमातून ते रेल्वे कार्यालयाशी कनेक्टेड राहतील. त्यामुळे प्रवाशांच्या यादीत आयत्या वेळेस होणाऱ्या बदलांची माहिती तपासकांनी वेळोवेळी मिळत राहील. त्यामुळे रद्द होणाऱ्या तिकीटांच्या जागा इतर प्रवाशांना देता येणे शक्य होईल. 


त्याचप्रमाणे प्रवाशांच्या नावाची यादीही डिजीटल स्वरुपात लावण्यात येईल. सध्या या याद्या लावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला दरवर्षी केवळ कागद खरेदीसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात. डिजीटल झाल्यामुळे हा खर्च वाचणार आहे. याची सुरुवात झाली आहे. 


त्याचप्रमाणे रिझर्व्हेशन चार्ट ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तो रेल्वेच्या डब्यांवर चिकटवण्याची प्रथाही हळूहळू बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या तिकीटाची स्थिती प्रवाशांना एका क्लिकवरच मिळू शकेल. 


कागदरहित कारभाराचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांना त्यांचे तिकीट प्रिंट न करता मोबाईलवर दाखवण्याची मुभा केव्हाच देण्यात आली आहे. डिजीटल झाल्याने रेल्वेचा खर्च तर वाचेलच; पण पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे. हा निर्णय घेतल्यावर 'आपण गेल्या अर्थसंकल्पात दिलेले आणखी एक आश्वासन पूर्ण केले आहे. पारदर्शकता आणि प्रवासी सुविधा यांच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे,' असे ट्वीट रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.