नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कान्हा, बांधवगडची जंगलसफारी घडविणार्‍या टायगर एक्स्प्रेस या लग्झरी रेल्वेचे उद्घाटन केले आहे. पर्यटकांना प्रत्यक्ष अभयारण्ये दाखवण्यासाठी व्याघ्र दर्शनाची संधी रेल्वे विभागाकडून दिली गेली आहे. ही एक्सप्रेस येत्या आक्टोबरपासून सुरू होणार असून नियमित स्वरूपात असणार आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकीटाच्या पैशांत पर्यटकांची राहणे, निवास, जेवण असा सर्व खर्च समाविष्ट आहे. ही ट्रेन दिल्लीतील सफदरजंग स्टेशनवरून सुटणार असून ५ दिवस आणि ६ रात्रीचा कालावधी असणार आहे. या प्रवासात मध्यप्रदेशातील कान्हा, बांधवगडसोबत धुवाँधार धबधब्याचे दर्शनही पर्यटकांना घडविणार आहे.

कान्हा व बांधवगड अभयारण्यात पर्यटकांची मुक्कामाची व्यवस्था आहे. या जंगलात वाघ, हरिणे, बारशिंगे, बिबटे यांचे दर्शन पर्यटकांना होऊ शकेल. ही रेल्वे आयआरसीटीसीतर्फे चालविली जाणार आहे.

वाघांच्या संरक्षणसंदर्भात आणि पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी ही एक्स्प्रेस चालविली जात असल्याचे प्रभूंनी सांगितले. यानंतर एलिफंटा एक्स्प्रेस व डेझर्ट एक्स्प्रेस या गाड्याही लवकरच सुरू केल्या जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.