नवी दिल्ली : समाजवादी पक्षात अंतर्गत राजकारणानं कळस गाठलाय. वडील, काका आणि पुतण्या सध्या याद्यांवर याद्या जाहीर करतायत. त्यामुळं युपी विधानसभेच्या एकूण जागांपेक्षा दीडपट अधिक उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर झालीयत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युपी विधानसभेच्या एकूण जागा आहेत 403
मुलायम सिंगांनी जाहीर केले 325 उमेदवार
शिवपाल यादवांनी जाहीर केले 78 उमेदवार
अखिलेश यादवांनी जाहीर केले 235 उमेदवार
403 जागांसाठी  628 उमेदवार


उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांतलं समाजवादी पक्षातलं अंतर्गत राजकारण चांगलंच ढवळून निघतंय. सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी विधानसभेच्या 325 जागांची यादी जाहीर केली. या यादीतून मुख्यमंत्री अखिलेश यादव समर्थकांची नावं गायब होती. 


नाराज अखिलेश समर्थकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. समर्थकांसोबत बैठक घेतल्यावर अखिलेश यादव आपल्या तीर्थरुपांना भेटले. मात्र तिथं काहीच डाळ न शिजल्यामुळं अखिलेश यांनी 235 उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करून टाकली. या यादीत 171 विद्यमान आमदार आणि 64 नव्या उमेदवारांची नावं आहेत. अखिलेश यांनी आपल्या यादीतून मुलायम आणि शिवपाल यादव समर्थकांची नावं कापून टाकली. 


यात भर म्हणून गुरुवारी रात्री उशिरा शिवपाल यादव यांनी ७8 उमेदवारांची यादी जाहीर करत मुलायम सिंहांची यादी पूर्ण केली. त्यानंतर मुलायमसिंह, अखिलेश आणि शिवपाल यांच्यात तीन तास बैठक झाली. आपण तयार केलेली यादी सर्वेक्षणाच्या आधारेच केली असल्याचा दावा शिवपाल यांनी केला. 


याला उत्तर म्हणून अखिलेश यांनी स्वतः केलेला सर्व्हे दाखवला. त्यामुळं पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. निवडणुका जाहीर होण्याअगोदरचा हा ट्रेलर पाहून, प्रत्यक्ष सिनेमा कसा असेल, याची उत्सुकता शिगेला पोचलीय.