मुंबई : लग्नाच्या नावावर आपल्या बँक अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी सरकारनं सूट दिली... त्यामुळे, लग्नघर आनंदले... मात्र, यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, यात मात्र स्पष्टता नव्हती. आता मात्र, या निर्णयानंतर तब्बल चार दिवसांनी आरबीआयनं याबद्दल विस्तृत अटी आणि नियम जाहीर केलेत. 


या आहेत अटी आणि शर्थी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं लग्नाचा खर्च करण्यासाठी आई-वडिलांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी हे नियम आणि अटी लागू केल्यात.   


- आपल्या अकाऊंटमधून अडीच लाख रुपये काढण्यासाठी तुम्हाला लग्नाची आमंत्रणपत्रिका, विवाहस्थळ आणि कॅटरिंग सेवा देणाऱ्यांची बिलं जोडावी लागतील. 


- हे पैसे काढण्याची परवानगी 8 नोव्हेंबरच्या सरकारच्या निर्णयापूर्वी अकाऊंटमध्ये उपलब्ध असलेल्या पैशांसाठीच लागू असेल. 


- 30 डिसेंबर किंवा त्यापूर्वी नियोजित विवाहांसाठीच ही रक्कम बँकेतून काढता येईल.


- या पद्धतीनं देण्यात आलेल्या पैशांबद्दल बँकांना सगळे रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. 


- लग्नासाठी म्हणून ज्यांनी ज्यांनी अडीच लाख रुपये काढलेत अशा सर्व व्यक्तींची एक यादी बनवण्याचे आदेश बँकांना दिले गेलेत. 


- बँका लग्नघरांना रोख रकमेशिवाय एनईएफटी, आरटीजीएस, चेक, ड्राफ्ट किंवा डेबिट कार्ड यांसारखी साधनं वापरण्यासाठीही प्रोत्साहीत करू शकतात.