नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या एका विधानानंतर आता जोरदार चर्चा सुरू झालीय. 'जोपर्यंत समलिंगी संबंधांचा समाजातील इतर लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत नाही, तोवर समलिंगी संबंधांना कायदेशीर गुन्हा मानलं जाऊ नये,' असं मत त्यांनी मांडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी, एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय. भारतीय दंड विधानाच्या ३७७ कलमाअंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हा मानलं जातं, त्यावर संघाची भूमिका काय आहे? असा प्रश्न होसबळे यांना केला गेला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. 


'लैंगिकता ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. संघाने यावर जाहीर कार्यक्रमात का वाच्यता करावी? संघाची त्यावर काहीच मतं नाहीत. लोकांनी त्यांच्यासाठी काय बरं वाईट ते ठरवावं. कोणाच्या लैंगिकतेविषयी संघात चर्चा केली जात नाही आणि आम्हाला ते करायचंही नाही,' असंही ते पुढे म्हणालेत. संघाच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं जातंय.


भारतीय दंड विधानाच्या ३७७ कलमानुसार समलिंगी संबंध प्रस्थापित करणे हे 'अनैसर्गिक' असून त्यास जास्तीत जास्त १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो. जगभरात अनेक राष्ट्रांत समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाल्यावर भारतातही तशी मागणी केली जात आहे. 


याच कार्यक्रमात पुढे बोलताना संघ भाजपला 'सिग्नल्स' देत असतो, पण संघ म्हणजे भाजपचा 'रिमोट कंट्रोल' असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.