चेन्नई : तमिळनाडूत जयललिता यांचा वारस कोण होणार याचं उत्तर मिळालंय. तमिळनाडूत अम्मांच्या जागी चिन्नम्मांची अर्थात शशिकला नटराजन यांची निवड झालीय. एआयएडीएमकेच्या सरचिटणीसपदी शशिकला यांच्या एकमताने निवड करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अण्णा द्रमुक पक्षाचे  सरचिटणीसपद गेली तीन दशके जयललिता यांच्याकडे होते. अण्णा द्रमुक पक्षाच्या बैठकीत शशिकला यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.अण्णा द्रमुकच्या महत्त्वाच्या बैठकीत शशिकला यांची एकमताने पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. 


मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांच्यासह एआयएडीएमकेच्या 23 नेत्यांनी शशिकला यांचे नेतृत्व मान्य करण्याचा प्रस्ताव मांडला.  या बैठकीत एकूण 14 ठराव मंजूर करण्यात आलेत. यासह जयललिता यांचा वाढदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा ठरावही या बैठकीत करण्यात आलाय.


या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अण्णा द्रमुक पक्षाचे जिल्हा सचिव चेन्नईत दाखल झाले होते. यावेळी सर्व जिल्हा सचिव, पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख यांनी शशिकला यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला शशिकला उपस्थित नव्हत्या. मात्र त्यांची एकमताने पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. 


अण्णाद्रमुक पक्षातील पदांच्या रचनेनुसार सरचिटणीसपदी असलेली व्यक्ती पक्षाची प्रमुख असते. त्यामुळे आता शशिकला यांच्याकडे अण्णा द्रमुकची धुरा असणार आहे. जयललिता यांनी दाखवलेला मार्ग स्मरणात ठेवून शशिकला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी घेतली. 
लोकसभेचे उपसभापती एम. थंबीदुराई, ज्येष्ठ नेते पनरुती एस. रामचंद्रन, राज्याचे मंत्री, पक्षाचे आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित होते.