मुंबई : नोटाबंदीच्या निर्णायमुळे सध्या देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकामध्ये सध्या पैशांचा महापूर आलाय. त्यामुळे आता बँकांनी जमा पैशावरचे व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातली सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेनं काल मुदत ठेवीवरच्या व्याजदरात कपात जाहीर केलीय. तीन वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधींच्या मुदत ठेवींवरचे व्याजदर शून्य पूर्णांक पंधरा दशांश टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.


नव्यानं मुदत ठेवीत पैसे जमा करणाऱ्यांसाठी हे दर लागू असतील. त्यामुळे सध्याच्या मुदत ठेवीदारांना चिंतेचं कारण नाही. 


स्टेट बँकेत देशभरातून १० डिसेंबरपासून पाचशे आणि हजारच्या नोटांच्या रुपात तब्बल १ लाख १४ हजार १३९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात मुदत ठेवींनंतर कर्जाचे दरही कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.


गृहकर्ज, वाहनकर्ज, आणि उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात कपात झाल्यास सामान्य आणि उद्योजक या दोघांनाही एकाच वेळी मोठा दिलासा मिळणार आहे.