शरद पवार : विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार?
राष्ट्रपती निवडणुकीसाठीची जुळवाजुळव राजधानी दिल्लीत सुरू झालीय. राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जातोय तर सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
रामराजे शिंदे, झी मिडीया, नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठीची जुळवाजुळव राजधानी दिल्लीत सुरू झालीय. राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जातोय तर सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ या निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून समविचारी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात. नितीश कुमार, सीताराम येचुरी, डी. राजा यांच्यापाठोपाठ शरद पवारांनीही सोनिया गांधींची भेट घेतलीय. राष्ट्रपती पदासाठी डाव्या पक्षांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्याचं समजतंय. शिवाय जेडीयूनंदेखील पवारांच्याच पारड्यात वजन टाकल्याचं समजतंय.
जमेच्या बाजू
- डावे आणि इतर पक्षांशी शरद पवारांची चांगली मैत्री आहे.
- प्रकाश करात, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
- मराठी माणूस म्हणून शिवसेनाही पवारांना पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे.
- मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, कृषीमंत्री अशी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलीत.
- समाजकारण आणि राजकारणातील अनुभव, ही त्यांची जमेची बाजू आहे.
विरोधातील बाजू
- तर सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा पवारांनी काढला होता. ही बाब त्यांच्या उमेदवारीला बाधक ठरू शकते.
- भाजपसोबत असलेली पवारांची जवळीक
- संसदेत कमी असलेलं संख्याबळ
- आणि विश्वास गमावलेला नेता अशी ओळख या त्यांच्यासाठी नकारात्मक बाबी ठरू शकतात
सोनियांचं मत कुणाला?
त्यामुळं सोनिया गांधी कोणाच्या नावाला पसंती देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसकडून पुन्हा प्रणव मुखर्जींचं नाव पुढं येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तमिळनाडूतला अण्णा द्रमुक, ओडीशातला बीजेडी, आंध्र प्रदेशातला वायएसआरसीपी, दिल्ली-पंजाबमधला आप, आणि हरयाणातला आयएनएलडी या सहा पक्षांची मतं निर्णायक ठरणार आहेत. या पक्षांकडं 13 टक्के मतमूल्य असल्यानं त्यांच्याच हातात राष्ट्रपतीपदाची चावी असणार आहे.
भाजपकडून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या नावांची चर्चा होती. मात्र बाबरी प्रकरणी कोर्टाच्या आदेशामुळं ती नावं मागे पडलीत. भाजपकडून सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज, नजमा हेपतुल्ला या तिघा महिलांसह व्यंकय्या नायडू हे उमेदवार असू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती हे मानाचं पद असल्यामुळं ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्यादृष्टीनं शरद पवारांनी जुळवाजुळव सुरू केलीय. पंतप्रधान होण्याचं पवारांचं टायमिंग अनेक वेळा चुकलं. निदान आता तरी घड्याळाचे काटे योग्य दिशेनं फिरणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय..