पवारांच्या घड्याळाचे काटे यावेळी योग्य दिशेला फिरणार?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय.
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळं दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू लागलंय. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ या निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून समविचारी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात.
नितीश कुमार, सीताराम येचुरी, डी. राजा यांच्यापाठोपाठ शरद पवारांनीही सोनिया गांधींची भेट घेतलीय. राष्ट्रपतीपदासाठी डाव्या पक्षांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्याचं समजतंय. शिवाय जेडीयूनं देखील पवारांच्याच पारड्यात वजन टाकल्याचं समजतंय.
डावे आणि इतर पक्षांशी शरद पवारांची चांगली मैत्री आहे. प्रकाश करात, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मराठी माणूस म्हणून शिवसेनाही पवारांना पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, कृषीमंत्री अशी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलीत. समाजकारण आणि राजकारणातील अनुभव, ही त्यांची जमेची बाजू आहे.
तर सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा पवारांनी काढला होता. ही बाब त्यांच्या उमेदवारीला बाधक ठरू शकते. भाजपसोबत असलेली पवारांची जवळीक, संसदेत कमी असलेलं संख्याबळ आणि विश्वास गमावलेला नेता अशी ओळख या त्यांच्यासाठी नकारात्मक बाबी ठरू शकतात.
त्यामुळं सोनिया गांधी कोणाच्या नावाला पसंती देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसकडून पुन्हा प्रणव मुखर्जींचं यांचे नाव पुढे केले तर शिवसेनासह इतर पक्ष सुद्धा प्रणव मुखर्जी यांच्या नावाला पाठींबा देण्याची शक्यता आहे. त्यावेळी शरद पवारांना आपले दबावतंत्र कामाला येणार नाही.
राष्ट्रपदीपदासाठी आवश्यक असणारे मतमुल्य ६ पक्षांकडे आहे. तमिळनाड़ूची एआईएडीएमके, बीजेडी (ओडीसा), वाईएसआरसीपी (आंध्र प्रदेश), आम आदमी पार्टी (दिल्ली व पंजाब) आणि आईएनएलडी (हरियाणा) या सहा पक्षांच्या मतमुल्ये १३ टक्के आहेत. त्यामुळे या पक्षांची मते ज्यांना मिळेल, तो उमेदवार राष्ट्रपतीपदी निवडणूक येऊ शकतो. या ६ पक्षांच्या हातात राष्ट्रपती पदाची चावी आहे.
सुप्रीम कोर्टानं अडवाणी आणि जोशी यांच्यावरील बाबरी मशिद प्रकरणी खटला चालवण्याला हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे अडवाणी आणि जोशी यांना राष्ट्रपतीपदाच्या मार्गात रेड सिग्नल मिळाला आहे.
भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज, नजमा हेपतुल्ला, वेंकय्या नायडू या नावांची चर्चा आहे. महिला उमेदवार असले तर विरोधकांकडून विरोध मावळण्याची शक्यता आहे.
सुमित्रा महाजन यांचे लोकसभेतील तीन वर्षाचे कामकाज पाहता त्यांना बक्षिस म्हणून राष्ट्रपती बनवले जाऊ शकते. सुषमा स्वराज यांची तब्येत ढासळत असल्यामुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे. नजमा हेपतुल्ला यांचा चेहरा देऊन अल्पसंख्यांक समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. तर, वेंकय्या नायडू यांच्यासारखा शिस्तप्रिय नेतासुद्धा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनू शकतो.
राष्ट्रपती हे मानाचे पद असल्यामुळे निवडणूकसुद्धा बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा सर्वच पक्षांची असते. परंतू शरद पवार यांनी इतर पक्षांना सोबत घेऊन जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत संधी मिळवण्याची जिद्द नेत्याच्या अंगी असावी लागते. भाजपमय झालेल्या वातावरणातही शरद पवार संधी शोधत आहेत. पवारांचं पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं टायमिंग अनेकवेळा चुकले. परंतू यावेळी त्यांचे घडयाळाचे काटे योग्य दिशेला फिरत आहेत का, हे लवकरच समजेल.