यादवी `सायकल` युद्ध निवडणूक आयोगाच्या दारात...
समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल कुणाची? याचा फैसला होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीतील यादवी संपणार की सुरुच राहणार याचाही निर्णय होण्याची चिन्हं आहेत.
नवी दिल्ली : समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल कुणाची? याचा फैसला होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीतील यादवी संपणार की सुरुच राहणार याचाही निर्णय होण्याची चिन्हं आहेत.
मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलीय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव या दोघांकडून सायकल या निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आलाय.
गेल्या आठवड्यात अखिलेश यांच्याकडून रामगोपाल यांनी निवडणूक आयोगात बाजू मांडली. यावेळी दोनशेहून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर करण्यात आलं. तसंच दीड लाख पानांचा दस्तावेजही सादर करण्यात आला.
यानंतर सोमवारी मुलायम सिंहांनी स्वतः निवडणूक आयोगात जाऊन आपली बाजू मांडली. आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत. त्यामुळे नाव आणि चिन्हावर त्यांनी आपला दावा सांगितला. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात.